वाहतूक कोंडी अन् रस्ते पर्यटनाच्या मुळावर

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसे व स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात.

उन्हाळी, दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर गर्दी करतात. मात्र यातील काही ऐतिहासिक पर्यटन स्थळांवर पोहचण्यासाठी असणार्‍या रस्त्यांची झालेली दुरवस्था व वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. विकेंडला फिरण्यासाठी अधिक पर्यटक बाहेर पडतात. त्यामुळे वाहतुकीवर ताण येतो.

शनिवार, रविवार हॉलिडे तर आता उन्हाळी सुट्टीत पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले आता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतील. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन सहली व विद्यार्थ्यांचा ओघ प्रचंड आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. असे असले तरी येथे दाखल होणारे पर्यटक, भाविक व प्रवासी मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पुरते हैराण झाले आहेत.वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना खोळंबून राहावे लागते. इच्छितस्थळी पोहचण्यासदेखील उशीर होतो. जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत सुरु आहेत. परिणामी येथे येणार्‍या पर्यटकांना खाचखळगे, खड्डे, अरुंद मार्ग आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. खराब रस्ते व वाहतूक कोंडी यामुळे असंख्य पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे.

पनवेल, पेण, अलिबाग, खोपोली, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या शहरात वाहतूक कोंडी नित्याची असते. जिल्ह्यातील अलिबाग- नागाव, आक्षी, रेवस, वरसोली, मुरूड- काशिद, श्रीवर्धन- दिवेआगर, हरिहरेश्‍वर, आदगाव येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. येथील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे मोठी वाहने तसेच दोन्ही बाजूने वाहन जाताना अडथळा निर्माण होतो. श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, अलिबाग शहरात देखील अरुंद रस्त्यामुळे कोंडी होते. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होतो. माथेरानला जाणार्‍या अरुंद व घाट रस्त्यामुळे देखील कोंडी होते.पालीतील काही अंतर्गत रस्ते खराब व अरुंद आहेत. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळते. परिणामी येथे येणार्‍या भाविकांचे हाल होतात. याबरोबरच वडखळ, पेण, रामवाडी, इंदापूर, कोलाड व लोणेरे आदी ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीला देखील प्रवासी व पर्यटकांना सामोरे जावे लागते.

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. परिणामी येथे व्यवस्थित आनंद घेता येत नाही. याशिवाय मग काही पर्यटक रायगड जिल्हा सोडून इतर जिल्ह्याकडे जसे सिंधुदुर्ग व रत्नागिरीकडे वळतात.

भीम महाडिक,
स्थानिक पाली
Exit mobile version