कल्याणीला रौप्य तर छकुलीला कांस्यपदक
| पणजी | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राच्या कल्याणी चुटे व छकुली सेलोकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवत योगासनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वरिष्ठ गटात पारंपरिक योगासनाच्या विभागात हे यश मिळाले.
या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना दोन अनिवार्य आसने करावी लागतात. त्यासाठी प्रत्येकी 15 सेकंदांचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर आणखी पाच ऐच्छिक आसने करावयाची असतात. त्यासाठी प्रत्येकी 15 सेकंदांचा वेळ दिलेला असतो. 23 वर्षांच्या कल्याणीने गतवर्षी दोन सुवर्णपदके जिंकली होती. ती नागपूर येथे कला शाखेमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे. नागपूरचीच खेळाडू असलेली छकुली ही भगवती प्रियदर्शनी महाविद्यालयात बी.टेक करीत आहे. 20 वर्षीय छकुलीला गतवर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळाली होती.
महाराष्ट्राचे दुसरे पदक निश्चित मोठ्या भावाच्याच पद्धतीने विजयाचा कित्ता गिरवत युवा यश गौडने एकतर्फी विजय साजरा करत महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक निश्चित केले. सोमवारी 60 ते 63.5 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पुण्याच्या यशने पंजाबच्या आशुतोष कुमारवर 5-0 असा दणदणीत विजय संपादन केला.
युवा बॉक्सिंगपटू किताबाचे दावेदार महाराष्ट्राचा ऋषीकेश आणि यश गौड हे दोघेही गुणवंत बॉक्सिंगपटू आहेत. यामुळे त्यांनी आपली लय कायम ठेवत पदकाचा पल्ला गाठला. याच विजयाने त्यांचा किताबाचा दावा मजबूत झाला आहे. यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातून हे दोघेही निश्चितपणे संघाला सोनेरी यश मिळवून देतील, असा विश्वास प्रशिक्षक बनसोडे यांनी व्यक्त केला.