। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सध्या ठाण्यात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी बॅनरबाजीही पाहायला मिळत आहे.
ठाण्यात मनसे विरुद्ध ठाकरे गट यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर आता ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कालच्या गडकरी रंगायतन या ठिकाणी झालेल्या राड्यानंतर रविवारी ठाणे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. ठाण्यातील नौपाडा विभागात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. शनिवारी 10 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला. दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले.