| अलिबाग | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत कोर्लई आदिवासीवाडी येथे पारंपरिक हळदी समारंभ सुरू असताना दोन गटांत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे भांडणात रूपांतर होताच गोंधळ वाढू नये म्हणून तक्रारदार व त्यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेले. आरोपीने संतापाच्या भरात लाकडी दांडक्याने तक्रारदाराच्या डोक्यात जोरदार मारहाण केली, तर मुलालाही हाताबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेनंतर कार्यक्रमस्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती उपस्थितांनी पोलिसांना कळवताच पथक घटनास्थळी दाखल झाले. काही काळ कार्यक्रम थांबवावा लागला. साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.







