| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील बोर्ली नाका येथे पुर्ववैमनस्यातून दोन कुटूंबात शिवीगाळ, मारहाण झाली. यामध्ये लोखंडी रॉड व मच्छी कापण्याच्या सुऱ्याने एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोर्ली गावातील मधला पाडा येथील दोन कुटूंबात पुर्ववैमनस्य आहे. 25 नोव्हेबर 2023 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास रोहित चिरायू (रा. बोर्ली) याचा चुलत लहान भाऊ रोश चिरायू हा बोर्ली नाका येथे दत्तात्रेय मिठाग्री यांच्या हॉटेलमध्ये मित्रा समवेत नाष्ता करायला गेला होता. तेथे सुबोध जायपाटील व दिप्ती जायपाटील यांनी घराबाबतचा जुना वाद उकरून काढला. यावेळी रोहित याने हे भांडण सोडविले. त्यानंतर रोश घरी जाण्यास निघाला असता, सुबोध आणि दिप्ती यांनी त्याला रस्तात अडवून शिवीगाळ केली.
याबाबत रोश याने रोहीतला मोबाईलवरुन झालेल्या घटनेची माहिती दिली. रोहितसह रोश यांचे वडील राजेंद्र चिरायू हे देखील तेथे पोहचले. यावेळी तेथे असलेल्या आर्य जायपाटील (रा.बोर्ली) याने रिक्षात असलेला लोखंडी रॉड सुबोध जायपाटील यांच्या हातात दिला. तसेच दिप्ती यांच्या हातात मच्छी कापण्याची सुरी दिली. सुबोध याने रोहित, राजेंद्र व रोश चिरायू यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तर दिप्ती हिने राजेंद्र यांना सुऱ्याने गंभीर दुखापत केली. तर आर्य जायपाटील याने हाताबुक्क्याने मारहाण केली. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात रोहित याच्या तक्रारीनुसार सुबोध जायपाटील, दिप्ती जायपाटील व आर्य जायपाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.