32 व्या दिवशी संपावर तोडगा नाही
| मुंबई | प्रतिनिधी |
आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे 35 हजार कंत्राटी डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेमुदत संपाच्या 32 व्या दिवशीही संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. संपकरी कर्मचाऱ्यांनी 12 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन चिघळत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान ही योजना राज्यात 2005 पासून सुरू झाली. डॉक्टर, तंत्रज्ञ तसेच आरोग्य विषयक वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने या अभियानात भरती करण्यात येत आहे. समान काम समान वेतन तसेच सेवेत कायम करण्यात यावे ही मागणी करत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या 35 हजार कर्मचाऱ्यांनी 22 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामीण भागातील लाखो शालेय बालकांच्या आरोग्याची तपासणी, जवळपास 10,800 उपकेंद्रांमधील बाह्यरुग्ण तपासणी, गरोदर मातांचे व बालकांचे लसीकरण, उपकेंद्रात होणारी प्रसुती, आरोग्य विषयक नोंदणी, कुष्ठरुग्ण व सिकलसेल रुग्णांची तपासणी व उपचार आदी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक सर्व कामे या संपामुळे ठप्प झाली आहेत. आरोग्य विषयक डाटा एंट्रीचे काम बंद झाल्यामुळे आरोग्य विषयक अचुक आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 31 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात या संपकरी कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. मंत्र्यांनी दिलेले आश्वासन लिखित स्वरूपात दिल्यास संप मागे घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना विचारले असता संपावरील कर्मचाऱ्यांबरोबर आमच्या चर्चा सुरु असल्याचे सांगितले.







