| पनवेल । वार्ताहर ।
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री खारघरमध्ये घडली. मोहित सिंग (20) असे आरोपीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला मिरारोड येथून अटक केली आहे. या घटनेतील जखमी तरुणावर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
खारघरमधील घरकुल सोसायटीत आपल्या मित्रांसोबत राहणार्या सुजित साबळेचा घरातील काम करण्यावरून मोहित याच्याशी वादावादी झाली होती. याच भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री मोहित याने जवळ असलेल्या चाकूने सुजितच्या गळ्यावर तीन तसेच छातीवर एक वार करून पलायन केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी सुजित सकाळपर्यंत त्याच ठिकाणी पडून होता. सकाळी एका सुरक्षारक्षकाला सुजित जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर याबाबत खारघर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुजितला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
या घटनेनंतर सुजितने दिलेल्या माहितीवरून आरोपी मोहित सिंगचा शोध सुरू केला होता. मोहित मिरारोड येथे आपल्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री आरोपी मोहित सिंगला मिरा रोड येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संतोष खाडे,
पोलीस उपनिरीक्षक