पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| कर्जत | प्रतिनिधी |

तालुक्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या दोन व्यक्तींनी वीस वर्षांपूर्वी विवाह केला होता. मात्र, त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होत असे. याला कंटाळून मुलीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. या प्रकरणाबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता. याचा राग मनात ठेवून नवऱ्याने रविवार, दि.28 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

कर्जत तालुक्यात राहणारे शेखर रामचंद्र रोकडे (44) आणि सैनी षसचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, क्षुल्लक कारणांवरुन त्यांच्यात वाद होत असे. याला कंटाळून त्याची पत्नी कविता शेखर रोकडे (35) हिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे न्यायालयात दावा दाखल केला व ती कर्जत शहरातील मुद्रे नाना मास्तर नगर येथे साई सावली अपार्टमेंटमध्ये राहू लागली, तर तिचा पती शेखर रोकडे दिपाली पार्क, शाश्वत पार्क बदलापूर ठाणे येथे राहावयास गेला. पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला याचा राग मनात ठेवून तिला ठार मारण्याचा बेत बनवला. त्यानुसार दि. 28 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी कविता मुद्रे नानामास्तर नगर येथून आपल्या स्कुटीने आपले वडील पुरुषोत्तम सैनी राहात असलेल्या नेमिनाथ येथे येत असताना मुद्रे गावचे हद्दीत फायरब्रिगेड ऑफिससमोर आली त्यावेळी त्या ठिकाणी पती शेखर रोकडे दबा धरून बसला होता. लोखंडी हत्याराने त्याने पत्नी कविताच्या डोक्यात पाठीमागे वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा माहिती कळताच कर्जत पोलीस घटनास्थळी त्वरित पोहोचले. त्यांनी जखमी कविताला त्वरित कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्यात जबर जखम असल्याने तिला पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कर्जत पोलिसांनी शेखर रोकडेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे करीत आहेत.

Exit mobile version