। पनवेल । वार्ताहर ।
टेम्पोचालक महेंद्र पटेल (27) हे नालासोपारा भागात राहण्यास असून सकाळच्या सुमारास दीपक फर्टिलायझर कंपनीत माल भरण्यासाठी जात होते. मुंब्रा-पनवेल मार्गावरील आरएएफ सिग्नलजवळ लघुशंका करण्यासाठी रस्त्यालगत टेम्पो उभा केला. त्यावेळी आरोपी सूरज याने लोखंडी सुर्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी लघवी केल्याने दोन हजार रुपये दंड द्यावा लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर टेम्पोचालक महेंद्रच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला.
आरोपी सूरजने टेम्पोचा ताबा घेऊन केबिनची झडती घेतली असता त्यात पैसे नसल्याने टेम्पोचालकला मालकाकडून गुगल पेवर 5 हजार रुपये मागवून घेण्यास बजावले. त्यानंतर टेम्पो तळोजा फेज-2 कडे नेण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहतूक कोंडी असल्याचे लक्षात आल्यानंतर टेम्पोचालकाने आरडाओरड केली. टेम्पोचालकाच्या प्रसंगावधानामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला.