। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव जवळील नाणोरे येथील एकता पेट्रोल पंपाजवळ पिकअपने विरुद्ध दिशेला येत समोरून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. सदरील अपघात सोमवार दि.22 रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास घडला.
ट्रक चालक मोहम्मद नईम गफारमिया हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलंड ट्रक (एमएच-46-सीएल-7553) जयगड ते कळंबोली अशी मुंबई-गोवा महामार्गाने घेऊन जात असताना मुंबई बाजूकडून येणारा पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकअप विरुद्ध दिशेला आणल्याने समोरून ट्रकला धडक लागली. या अपघातात टेम्पो चालक रवी दादासो पवार (26) व रोहन रघुनाथ भानसे (18) ढालघर-माणगाव दोघे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप करीत आहेत.