दोघे पोलिसांच्या ताब्यात
| उरण | प्रतिनिधी |
दुचाकीवरून घरी जाणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवायचे, लोखंडी हत्याराने डोक्यावर सपासप वार करायचे आणि त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून द्यायचे, असा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उरण परिसरात घडला आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उरण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी अष्टांग ऊर्फ सर्वेश हरेश्वर पाटील आणि ऋतिक पांडुरंग चाळके यांचा तरुणासोबत पूर्वीपासून वाद होता. याच वादाचा राग मनात धरून दोघांनी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदार सायंकाळी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून कामावरून घरी जात असताना आरोपी बुलेट मोटारसायकलवरून त्यांच्या मागावर आले. रस्त्यात तक्रारदार यांना अडवून खाली उतरवले आणि पकडून ठेवत लोखंडी हत्याराने डोक्यावर पाच ते सात वार केले. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत. तक्रारदार यांना जमिनीवर पाडल्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून आग लावल्याचा गंभीर आरोप आहे. जुन्या वादातून थेट जिवावर उठण्यापर्यंत मजल गेल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. या तपासातून अष्टांग ऊर्फ सर्वेश पाटील आणि ऋतिक चाळके या दोघांना नवी मुंबई परिसरातून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, पोलीस निरीक्षक राहुल काटवानी, पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील, वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा, जयंत घरत, शशिकांत घरत, किशोर फंड, अनिल मानकर, गंगाराम कचरे, रियाज शेख आणि बसवराज सकपाळ यांनी सहभाग घेतला.







