रेल्वेत ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून पत्रकबाजी
| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना टार्गेट करत धर्मांतराचे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या एका वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून धार्मिक प्रचार करणारी पत्रके छुप्या पद्धतीने वाटली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एसी लोकलच्या डब्यामध्ये खिडकीच्या बाजूला असलेल्या पॅनेलवर एक घ्या असे लिहिलेले पाकीट चिकटवण्यात आले होते. प्रवाशाने जेव्हा ते पत्रक काढून पाहिले, तेव्हा त्यावर “जीवनरेखा हवी आहे का?” असा मुख्य मथळा छापलेला होता. या पत्रकाच्या आतील मजकुरात येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्माशी संबंधित धार्मिक प्रचार आणि उपदेश लिहिलेले आढळून आले असून, रेल्वे प्रवाशांना आकर्षित करून त्यांचे ब्रेनवॉश करण्याच्या उद्देशानेच ही पत्रके तिथे ठेवण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार लोकल ट्रेन खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ असताना एका सजग प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, ज्याचा संदर्भ रेल्वेच्या डिजिटल इंडिकेटरवर स्पष्ट दिसतो. रेल्वेसारख्या सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे छुप्या पद्धतीने धार्मिक प्रचार आणि धर्मांतराचे प्रयत्न होत असल्यामुळे रेल्वे सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
