| महाड | वार्ताहर |
महाड मध्ये मटका, जुगार, भिंगरूट अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरु असून, पोलिसांनी हे व्यवसाय बंद करावेत नाही तर प्रशासनाच्या विरोधात आज आत्मदहन करणार असल्याचा इशारा समाज सेवक सुभाष मोरे यांनी दिला होता. त्या प्रमाणे त्यांनी आज मंगळवारी (दि.13) रोजी 12 वाजता महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कते मुळे अनर्थ टळला.
महाड तालुक्यामध्ये मटका, जुगार, भिंगरूट अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरु असून, हे पोलीस प्रशासनाने बंद करावेत अशी मागणी सातत्याने समाज सेवक सुभाष मोरे यांनी करून देखील पोलिसांच्या आशीर्वादाने हे सुरूच राहिले. जर हे बंद झाले नाहीतर आज महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत दुपारी 12 वाजता आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या प्रमाणे ते हातात डिझेल ने भरलेला कॅन घेऊन पोलीस ठाणे हद्दीत येऊन आपल्या अंगावर डिझेल ओतुन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासनाला अगोदरच याची खबर असल्याने त्यांनी धाव घेत पेटवून घेण्या अगोदरच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. महत्त्वाचे म्हणजे महाड शहर पोलीस स्टेशन मधील इतिहासातील पहिलीच आत्मदहन करण्याची घटना आहे. या घटने नंतर महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, सुभाष मोरे यांच्या मागणीनुसार पुढील कारवाईचे आश्वासन महाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.