अल्पवयीन मुलीला देहविक्रीस भाग पाडण्याचा प्रयत्न; मांडवा पोलिसांत गुन्हा दाखल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पाथर्डी अहमदनगर येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने पनवेलवरुन अलिबाग-सासवणे येथील फार्म हाऊसवर आणून तिला ग्राहकांसोबत देहविक्री करण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. सदर मुलीने हुशारीने आईस्क्रिम खाण्याच्या बहाण्याने बाहेर पडत गुंगारा देत पोलिस ठाणे गाठल्याने देहविक्रीचा व्यापार करणार्‍या दोन महिलेसह तिचा मुलगा व फार्म हाऊस मालकाला पोलिसांनी अटक केले आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून एक 16 वर्षीय मुलगी काही क्षुल्लक कारणांवरुन घर सोडून गेली होती. सदर मुलगी पुणे येथे पोहचली. त्यानंतर ती चेन्नई येथे जाऊन गोवा त्यानंतर बेळगाव असा प्रवास करत केरळ असा प्रवास करीत शेवटी ती पनवेल येथे पोहचली. तिची पर्स चोरीला गेल्याने ती दिवसभर पनवेल बस स्थानकातच बसून होती. त्यावेळी रोहा तालुक्यातील नागोठणे येथील हुजरा मोहल्ला येथील दोन महिलांनी तिची विचारपूस केली असता तीने पर्स चोरीला गेल्याचे सांगत आपण कामाच्या शोधात असल्याचे सांगितले. त्यावर या महिलांनी चांगले काम देण्याचे आश्‍वासन देत पनवेल येथील एका लॉजवर ठेवले. त्यानंतर करंजा येथून रेवस येथे बोटीने आणून आपल्या मुलाच्या ताब्यात दिले. त्याने मोटारसायकलवरुन सदर मुलीला सासवणे येथील किशोर फार्म हाऊस येथे आणले. त्यानंतर त्याने काही ग्राहकांना बोलावून तिला त्यांच्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यावर हादरलेल्या मुलीने त्याला विरोध केला. मात्र तिच्या विरोधाला न जुमानता तुला शारिरिक संबंध ठेवावेच लागतील असे सांगून धमकावण्यास सुरुवात केली.

घाबरलेल्या मुलीने तयारी दाखवित संबंधीत ग्राहकाजवळ आपल्याला आईस्क्रिम खायची इच्छा असल्याचे सांगत तिथून बाहेर नेले. फार्म हाऊस बाहेर येताच त्यांना गुंगारा देत ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. काही ग्रामस्थांच्या मदतीने तीने मांडवा पोलिस ठाणे गाठले. तिची कैफियत ऐकून उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी तातडीने कारवाई करीत फार्म हाऊस मालकासह दोन महिला आणि तिच्या मुलाला अटक केली.

सदर मुलीच्या वडिलांना संपर्क साधत याबाबतची कल्पना दिली. आरोपी नराधमांना अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम करीत आहेत.

Exit mobile version