। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था।
सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत तीन मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न एका व्यापाऱ्याने केला आहे. त्यातील एका चार वर्षीय मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्समधील कापड दुकानात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हुसेन गडीयाली याला अटक केली आहे.
पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली तेव्हा रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करीत असताना पत्नी घरी जाणार नाही. मी दुकानातच राहणार आहे, असे ठामपणे सांगत राहिली. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. ‘तू दुकानातून घरी जा…तू घरी गेली नाहीस, तर तुला आणि मुलांना मारून टाकीन’, तसेच स्वतःला संपवून घेईन, अशी धमकी पतीने दिली. यावेळी हुसेन गडीयाली यांनी रागाच्या भरात पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. त्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरनी तात्काळ प्राथमिक उपचार केल्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.