| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे उपनगरातील हॉटेल चालकाकडून महिन्याला पाच हजार रूपयांचा हप्ता देण्यावरून झालेल्या वादानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकावर तलवारीने केलेल्या हल्ल्यातील संशयित आरोपीला कामोठे पोलिसांनी कळंबोली येथून अटक केली आहे. आशिष घोडके उर्फ आशाभाय असे त्याचे नाव आहे. अजून तीन दिवस अशोकला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशोकवर यापूर्वीसुद्धा मारहाणीचे भांडुप व कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.
30 वर्षांचा अशोक हा मूळचा सांगली येथील राहणारा असून, त्याला यापूर्वी भांडूपच्या एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो मुंबईच्या कारागृहात अनेक महिने राहिला. त्यानंतर तो कामोठे येथील सेक्टर 35 मध्ये कुटुंबासोबत राहू लागला. प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी त्याने स्वतःची मोटार खरेदी करून तो मोटार चालक म्हणून व्यवसात करत होता. या दरम्यान कळंबोली पोलीस ठाण्यात 2018 मध्ये अशोकवर अजून एक मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.
16 मार्चच्या मध्यरात्री मित्रांसोबत अशोक कामोठे येथील सेक्टर 6 ए मधील सरोवर बारमध्ये दारू व जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेल्यावर त्याने हॉटेल व्यवस्थापकाला बाहेरून आलेल्या व्यक्ती धंदा करताय, महिन्याला पाच हजार रूपयांचा हफ्त्याची मागणी केली. यामुळे हॉटेल व्यवस्थापक आणि अशोक व त्याचे अन्य मित्रांसोबत वाद झाला. हॉटेल व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी अशोक व त्याच्या मित्रांना पिटाळून लावले. मात्र, याच वादाचा राग मनात धरून अशोकने दुसऱ्या दिवशी 17 मार्चला तलवार घेऊन हॉटेल व्यवस्थापक उमेश शेट्टीला मारहाण केली.
या मारहाणीचे चित्रिकरण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या सूचनेनंतर कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण, पोलीस हवालदार संजय झोळ, पोलीस शिपाई प्रमोद कोकाटे, राजेंद्र इलग यांच्या पथकाने सपून बसलेल्या अशोकला कळंबोली येथील अग्निशमन दलाशेजारील पुलाखालून पकडले. अद्याप अशोकने तलवार कोणाकडून खरेदी केली, याची माहिती पोलिसांनी दिली नाही.







