पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंच्या सूचना
| कर्जत | प्रतिनिधी |
पत्रकाराच्या संरक्षणासाठी कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे राजकीय व गुंड प्रवृत्तीकडून पत्रकारांवर सतत हल्ले होत आहेत. कायदा करून त्याची जर अंमलबजावणी होत नसेल, तर त्याचा फायदाच काय ही बाब राज्य शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी गुरुवार, दि. 17 ऑगस्ट रोजी निदर्शने झाली. कायद्याची होळी करून प्रत्येक तहसील कार्यालयात पत्रकारांच्यावतीने निवेदन देण्यात आले. पत्रकारांच्या आंदोलनाची दखल घेत रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यात याबाबत दखल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर गुंडानी भ्याड हल्ला केला आहे. यात महाजन जखमी झाले आहेत. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानादेखील त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे खेदजनक वास्तव वारंवार समोर येत आहे. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेकडून राज्यातील सर्व पत्रकार संघटनांना याबाबत निषेध व्यक्त करत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचे आवाहन केले होते. पत्रकारांचे आंदोलनाची दखल घेत सोमनाथ घार्गे यांनी कालच परिपत्रक काढून सर्व पोलीस ठाण्यात पाठवले आहे.
या परिपत्रकामध्ये प्रसारमाध्यमे समाजामध्ये जागृती आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असते. रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आमची समक्ष भेट घेऊन पत्रकारांवरील हल्ले वाढत असूनही पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी होत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपले विभागीय स्तरावर तातडीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करुन आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सदर कायद्यातील तरतुदींची माहिती करुन द्यावी. पत्रकारांच्या अनुषंगाने शारीरिक हमला, मालमत्तेचे नुकसान, धमक्या, शिवीगाळ अशा तक्रारी प्राप्त झाल्यास त्यास तात्काळ प्रतिसाद देऊन नमूद कायद्यातील तरतुदींची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.