ग्रामपंचायत युनियनकडून लेखी तक्रार
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता असून त्यांच्याकडून ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे यांना मानसिक त्रास होत असल्याची तक्रार ग्राम विकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे, निवेदन गट विकास अधिकारी संदीप कराड यांना देण्यात आले आहे.
अतुल मालकर हे खालापूर तालुक्यातील तळवली येथील रहिवाशी आहेत. ते जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत कंत्राटदार असून ग्रुप ग्रामपंचायत वडगांव ग्रामपंचायत अधिकारी सुहास वारे यांच्याविषयी बिनबुडाचे, कोणतेही पुरावे नसताना वारंवार ऑनलाईंन तक्रारी करत आहेत. आजपर्यंत त्यांनी 254 तक्रार अर्ज केलेले आहेत. त्यांना ग्रामपंचायत विकास कामांचा ठेका मिळावा, तसेच ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील होणाऱ्या 2 कोटी रुपयांच्या विकास कामांची मागणी करत आहेत. ते दडपशाहीचा वापर करून ही कामे न दिल्यास या पुढे देखील तक्रार करत राहणार, अशा स्वरुपाचा इशारा दिली आहे. मागील ग्रामपंचायत लोक प्रतिनिधींवरील राग ते व्यक्त करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुहास वारे हे प्रचंड मानसिक दबावाखाली असल्यामुळे त्यांना रक्त दाबाचा त्रास सुरु झाला आहे. परिणामी काही अनुचित घटना घडू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
