अतुल झेंडे यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न पुरस्कार प्रदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पोलीस दलात व सामाजिक क्षेत्रात कमी वयात केलेल्या उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल छत्रपती संभाजी महाराज उत्सव सोहळा समिती किल्ले पुरंदर यांच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न पुरस्कार पुरंदरचे सुपुत्र तथा रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना हा पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे , राज्यमंत्री विश्वजीत कदम, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, युवराज शहाजीराजे छत्रपती , संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुरंदरचे आमदार संजय जगताप , अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कोंढरे पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा पाटणे , उत्सव समिती अध्यक्ष प्रदीप बोरकर यांच्या शुभहस्ते अतुल झेंडे साहेब यांचे वडिल उत्तमराव झेंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, उत्सव समितीचे सदस्य , आणि विविध जिल्ह्यांतील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतुल झेंडे यांच्या बुलढाणा , नाशिक , रायगड , सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कायदा सुव्यवस्था राखत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करत गुन्हेगारांना शिक्षा देत सर्वसामान्याला न्याय देण्याचे काम करणे. नाशिक येथील कुंभमेळा व पंढरपुरीची आषाढी वारीचे यशस्वी नियोजन , कोविड काळात पोलीस खात्यातील कुटुंबासोबत सामाजातील गोरगरीबांना अहोरात्र आर्थिक व मानसिक पाठबळ देणे , युवक युवतींना व्यसनमुक्ती व सोशल मीडिया पासून दूर राहणे याबाबत मार्गदर्शन तसेच सामाजिक शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रम रबविणे अशा अनेक पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल तसेच पोलिस दलात काम करत असताना देखील ज्या मातीने मोठे केले त्या पुरंदर सारख्या दुष्काळी ग्रामीण भागातील विकासासाठी तेथील युवकांचे संघटन, स्पर्धा परिक्षेंचा अभ्यास करणारे विद्यार्थी, उद्योग व्यवसाय करणारे तरूण यांना मार्गदर्शन व मदत करणे . यामुळे पुरंदर तालुक्यातील अधिकारी बनन्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांचे ते प्रेरणास्थान झाले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनछत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्सव समिती च्या वतीने २०२२ चा उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
उत्सव समितीच्या वतीने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे वडील उत्तमराव बोलताना म्हणाले की. धनदौलतीपेक्षा कितीतरी पटीने मोठा असलेला मुलाच्या कार्याचा गौरवाचा पुरस्कार स्विकारताना मनोमन आनंद होवून आम्ही केलेल्या कष्टाचे सार्थक झाले. असे सांगत असताना त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . पुरस्कार मिळाल्यानंतर अतुल झेंडे यांचे सर्वत्र कौतुक होवून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version