। पालघर । प्रतिनिधी ।
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवर, बेकायदेशीरपणे बसणार्या फेरीवाल्यांवर तसेच धोकादायक इमारतींवर कारवाई केली जाते. यादरम्यान बरेच साहित्य जप्त करून महापालिका आपल्या ताब्यात घेते. तसेच, हे साहित्य गेल्या अनेक वर्षांपासून भाईंदर येथील उड्डाण पुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेत ठेवल्यामुळे त्याला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवाय परिसरातील राहणार्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या साहित्याची विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने लिलाव करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी अतिक्रमण विभागाला साहित्याचे सर्वेक्षण करून निविदा प्रक्रिया राबवून घेण्याचे आदेश दिले आहेत. यात साहित्याच्या मूल्यांकनवरून योग्य पैसे देणार्या कंत्राटदाराला हे साहित्य दिले जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संजय दोंदे यांनी दिली आहे.







