। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे रंगणार्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी असेल. कोलकाता येथे होणार्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी मात्र स्टेडियमच्या प्रेक्षकक्षमतेपैकी 75 टक्के चाहत्यांना मुभा देण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणारे एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होतील, असे गुजरात क्रिकेट संघटनेने मंगळवारी जाहीर केले. उभय संघांतील पहिला सामना हा भारताचा एक हजारावा एकदिवसीय सामना असेल. हजार एकदिवसीय लढती खेळणारा भारत हा विश्वातील पहिलाच संघ ठरणार आहे. कोलकाता येथे होणार्या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी 75 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येईल. पश्चिम बंगाल शासनाने मंगळवारी राज्यातील करोना निर्बंध शिथिल करताना याविषयी घोषणा केली. इडन गार्डन्स येथे अनुक्रमे 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला भारत-विंडीज यांच्यात ट्वेन्टी-20 सामने होतील.
