कुडे लेणी येथे ऑडिओ गाईड क्यूआर कोडचे उद्घाटन

स्कॅनरद्वारे पर्यटकांना मिळणार सविस्तर माहिती

। तळा । प्रतिनिधी ।

तळा तालुक्यातील ऐतिहासिक प्राचीन कुडा लेण्यांविषयी माहिती देणाऱ्या ऑडिओ गाईड क्यूआर कोडचे उद्घाटन भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली डायरेक्टर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्लीचे डायरेक्टर, मुंबई सर्कलचे अधीक्षक अभिजीत आंबेकर, मुरुड जंजिरा उप मंडळचे अधिकारी बजरंग येलीकर, येलीकर तसेच कर्मचारी, पर्यटक उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यामध्ये कुडे येथील लेण्यांचा समूह एक प्रसिद्ध लेणी समूह आहे. कुडे लेणी तीन स्तरात कोरलेल्या आहेत. या लेणी समूहामध्ये अकरा पाण्याची टाकी, पाच चैत्यगृह आणि अन्यविहार आहेत. लेणी क्रमांक सहा सर्वात मोठे चैत्यगृह आहे. दुसऱ्या टप्प्यातील लेण्यांच्या समोरून पर्यटकांना राजपुरी खाडीचे विहंगमय दृश्य पहावयास मिळते. मुंबई-पुणेपासून साधारणत: दिडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या इंदापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर कुडे लेणी आहे. या लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांना लेण्यांविषयी माहिती मिळावी, याकरिता भारतीय पुरातत्व विभागाने क्यूआर कोड स्कॅनर ऑडिओ गाईडची सुविधा हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांनी क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल फोनमध्ये येणाऱ्या डॅशबोर्डवर मोबाईल नंबर समाविष्ट करून स्टार्ट ऑडिओ गाईड या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यावर लेण्यांविषयीची सविस्तर माहिती ऑडिओ स्वरूपात मोबाईल फोनमध्ये पर्यटकांना ऐकायला मिळणार आहे.

Exit mobile version