| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील ऐतिहासिक कुडा बुद्धलेणी येथे वर्षावास मालिका प्रवचन सोहळ्यासाठी भीमसागर उसळला. भाद्रपद पोर्णिमेदिनी तळा तालुक्यातील कुडा बुध्द लेणी येथे भारतीय बौध्द महासभा, रायगड जिल्हा दक्षिण विभाग, तालुका शाखा तळा,तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगड, बौध्दजन पंचायत समिती तालुका तळा लेणी संवर्धक, भीम फाउंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंत आंबेडकर, भिकाजी कांबळे गुरुजी, सुशिल वाघमारे उपस्थित होते. प्रथमतः भीमराव आंबेडकर यांचा तळा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर व उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे सर्व नगरसेवक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालय ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाद्य, लेझीमच्या तालावर आणि घोषणांच्या जयघोषात भीमराव आंबेडकर आणि भन्ते गण यांची भीम अनुयायी व समता सैनिक दलाच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या ठिकाणी भन्ते, मान्यवर आणि उपासक गण यांनी वंदना घेतली. त्यानंतर तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने भीमराव यांचे संस्थेच्या सभागृहात स्वागत करण्यात आले. यावेळी भिमराव आंबेडकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पुस्तके भेट देण्यात आले.
कुडे बुद्ध लेणी येथे लेणी संवर्धन समूहाच्या वतीने नियोजित लेणी माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी हजारे भीम अनुयायी उपस्थित होते. लेणीतील स्तुपासमोर वंदना सुत्रपठन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी केले तर आभार तळा तालुका सरचिटणीस प्रकाश गायकवाड यांनी मानले.