गाणी ग्रामपंचायतीची पंचायतराज तर्फे तपासणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26 अंतर्गत, श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी येथे निर्धारित आठ घटकांवर आधारित तपासणी नुकतीच पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती कागल येथील तपासणी पथकाने गाणी ग्रामपंचायतीला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. या तपासणीअंती समितीचे अध्यक्ष तथा कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांनी ग्रामपंचायतीच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

राज्य शासनाच्या आदेशानुसार, 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी आठ प्रमुख घटकांचे मूल्यमापन केले जाते. कागल येथील पथकाने ग्रामपंचायतीचे दप्तर, आर्थिक नियोजन, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी या निकषांवर बारकाईने तपासणी केली. तपासणी दरम्यान केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीवर झालेली कामे पाहून समितीने समाधान व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांनी शैक्षणिक व पोषणविषयक कामाची माहिती दिली. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

गाणी ग्रामपंचायतीने अभियानातील आठही घटकांवर उत्तम काम केले आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळेच हे शक्य झाले असून, ही ग्रामपंचायत इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल.

कुलदीप बोंगे ,
गटविकास अधिकारी,
पंचायत समिती कागल.
Exit mobile version