सात महिन्यात 420 बालके ठणठणीत
अलिबाग | विषेश प्रतिनिधी |
रायगडातील कुपोषणमुक्तीचे प्रमाण वाढत चालले असून,गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात 420 बालके कुपोषणमुक्त झालीत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीता जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर असलेल्या अनेक निर्बंधांचा सामना सर्वांना करावा लागला. अशा परिस्थितीत कुपोषित बालकांच्या आरोग्याची व आहाराची काळजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लिलया पेलली असून, एप्रिल 2021फते ऑक्टोंबर 2021 या 2021/22 या आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील 420 बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
डॉ.किरण पाटील,सीईओ,जि.प.
मागील काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा सामना करावा लागला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले होते. अशा परिस्थितीत बालकांची योग्य काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली. नियमितपणे बालकांचे सर्वेक्षण करून, त्यामध्ये आढळलेल्या कुपोषित बालकांच्या आहारासोबत त्यांना इतर वैद्यकीय उपचार वेळीच देण्यात आले. यामुळे मागील सात महिन्यात 420 कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीता जाधव, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य आपापल्या विभागातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची माहिती सातत्याने घेत होते. अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी कुपोषित बालकांची योग्य ती काळजी घेतली. कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेत आढलून आलेल्या कुपोषित बालकांना पोषण आहार तसेच आवश्यक उपचार करण्यात आले.
दरमहा तपासणी
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दर महिन्यात बालकांचे वजन घेण्यात येते आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वयानुसार बालकांचे किमान वजन व उंची किती असली पाहिजे याचे निकष निश्चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते.
