वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय
| दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी धुव्वा उडवला आहे. विश्वचषकामधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 400 धावांचे आव्हान नेदरलँड्सला पेलवलेच नाही. त्यांना 100 धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण नेदरलँड्सचा संघ 90 धावांमध्ये गुंडाळला.
ॲडम झाम्पा आणि मिचेल मार्श यांनी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवले. झाम्पाने 4 तर मार्शने 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेलच्या वादळी खेळीत नेदरलँडसच्या गोलंदाजीचा पालापाचोळा झाला. मॅक्सवेलने 44 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरनेही शतक झळकावले. सलामीवीर म्हणून त्याने 93 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. वॉर्नरच्या या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर, स्टीव्ह स्मिथने 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 68 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार लगावले. लॅबुशेनने 47 चेंडूत 62 धावा केल्या. पॅट कमिन्स 12 धावा करून नाबाद राहिला. मिचेल मार्श 9 धावा करून बाद झाला.
ऑस्ट्रेलियाने नेदरलँडसला विजयासाठी 400 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात संपूर्ण संघ 21 षटकांत 90 धावा करून सर्वबाद झाला. सलामीवीर विक्रमजीत सिंगने 25 चेंडूत 25 धावांची खेळी साकारली. कॉलिन अकरमन 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. एंगलब्रेट 21 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. बास डी लीडे अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तेजा निदामनुरु 18 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. लोगान व्हॅन बीकला खातेही उघडता आले नाही. व्हॅन डर मर्वेही शून्यावर बाद झाला. आर्यन दत्त 1 धावा करून बाद झाला.ऑस्ट्रेलियन संघांच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही नेदरलँडसवर वर्चस्व गाजवले. फिरकीपटू ॲडम झाम्पाने 3 षटकांत केवळ 8 धावा देत 4 बळी घेतले. मिचेल मार्शने 4 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. पॅट कमिन्सने 4 षटकात 14 धावा देत एक विकेट घेतली. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कनेही प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.