लंकेचा सलग तिसरा पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. श्रीलंकेवर पाच विकेटने मात केली. श्रीलंकेच्या घसरगुंडीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. बिनबाद 125 आणि सर्व बाद 209 अशी घसरगुंडी उडालेल्या श्रीलंकेने 84 धावांत त्यांनी दहाही फलंदाज गमावले. या आव्हानसमोर ऑस्ट्रेलियाची 2 बाद 24 अशी अवस्था झाली होती, मिचेल मार्शने 40 धावाचे योगदान दिले, त्यानंतर जोश इग्निशने 58 धावा करत लाबुशेनसह 77 धावांची भागीदारी केली आणि विजय सोपा केला. मॅक्सवेलने 21 चेंडूत नाबाद 31 तर स्टॉयनिसने 10 चेंडूत 20 धावा केल्या त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आव्हान 35.2 षटकांत पार करत सरासरीही उंचावली.
या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ 10व्या स्थानावर होता, तर आता तो 8व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी, सामन्यापूर्वी, श्रीलंका संघ आठव्या स्थानावर होता, जो 9व्या स्थानावर घसरला आणि नेदरलँड्स 9व्या स्थानावरून 10व्या स्थानावर आहे. 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका आणि नेदरलँड्स हे दोनच संघ आहेत, ज्यांचे गुणांचे खाते अद्याप उघडलेले नाही. त्याच वेळी, भारत आणि न्यूझीलंडसारख्या संघांनी प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वास कमजोर झालेल्या माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर श्रीलंकेने 22 व्या षटकापर्यंत वर्चस्व राखले होते, परंतु त्यानंतर त्यांची घसरगुंडी झाली, त्यामुळे त्यांना पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत… 11.5 षटकांत त्यांनी शरणागती स्वीकारली.दासून शनाका जखमी झाल्याने स्पर्धेबाहेर गेला आणि त्याच्याऐवजी कर्णधार झालेल्या कुशल मेंडीसच्या श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. चांगल्या खेळपट्टीवर पाथून निस्सांका (61) आणि कुशल परेरा (78) यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 125 धावांची सलामी दिली, तेव्हा लंकेचा संघ त्रिशतकी मजल मारणार असे चित्र होते, परंतु ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने निस्सांकाच्या यष्टींचा 22 व्या षटकांत वेध घेतला आणि तेथून चित्र बदलत गेले.
पहिल्या दोन पराभवांना ऑस्ट्रेलियाचे सुमार क्षेत्ररक्षण कारणीभूत होते, आजही सुरुवातीला त्यात फरक पडला नव्हता, परंतु निस्सांकाला बाद केल्यानंतर कमिन्सच्या चेंडूवर कुशल परेराचा झेल वॉर्नरने टिपला आणि तेथूनच ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षणात बदल झाला. याच वॉर्नरने झॅम्पाच्या चेंडूवर कुशल मेंडिसचा धावत जाऊन अप्रतिम डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल पकडला, त्या वेळी सर्व खेळाडूंनी तेथे जाऊन वॉर्नरचे अभिनंदन केले, हा झेल जणू काही त्यांच्यासाठी टॉनिक ठरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे थ्रोही अचुक झाले. अशाच एका फेकीवर कमिन्सने वेल्लालागेला धावचीत केले. श्रीलंकेच्या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता त्यांचे इतर सर्व फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत.