| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या आगामी महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यीय बलाढ्य संघाची घोषणा केली आहे. 12 जूनपासून सुरू होणाऱ्या या महाकुंभासाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू सोफी मोलिनक्सकडे सोपवण्यात आले आहे. या निवडीत काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले असून, युवा रक्ताला अधिक संधी देण्यात आली आहे.
या संघ निवडीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउनला वगळण्यात आले आहे. ब्राउनने 41 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 34 विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या जागी 20 वर्षीय लूसी हॅमिल्टनचा संघात समावेश करण्यात आला आहे. हॅमिल्टनकडे जरी आंतरराष्ट्रीय टी-20 चा अनुभव कमी असला, तरी तिने 19 वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. ऑस्ट्रेलियन संघात एलिस पेरी, बेथ मूनी, श गार्डनर आणि मेगन शट यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, ज्या कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता ठेवतात. तसेच, जॉर्जिया वोल ही 22 वर्षीय खेळाडू आपला पहिला टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज आहे. सोफी मोलिनक्सच्या नेतृत्वाखालील या संघात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंची मोठी फळी आहे.







