ऑस्ट्रेलियाला मोठ्या विश्वविक्रमाची संधी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठीच्या सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. यंदा तब्बल 20 संघात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसेच, अमेरिकेत पहिल्यांदाच इतकी मोठी क्रिकेट स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली, तर जवळपास सर्वच आयसीसी स्पर्धांवर सध्या त्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. तसेच, तिन्ही क्रिकेट प्रकारातील आयसीसी स्पर्धांमधील ते सध्याचे चॅम्पियन होतील.

म्हणजेच सध्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय चषक विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात गेल्यावर्षी या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले होते. तसेच, 19 वर्षांखालील पुरुष एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपदही ऑस्ट्रेलियाकडे आहे. याशिवाय महिला क्रिकेटमध्येही एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळे जवळपास सर्वच महत्त्वाचा स्पर्धांचे विजेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेचेही विजेतेपदही मिळवले, तर ते एकाचवेळी पुरुषांच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मधील विश्वविजेते होतील आणि असा पराक्रम करणाराही पहिलाच देश ठरतील.

Exit mobile version