ऑस्ट्रेलियाची भारतावर मात; 5-1 असा सहज विजय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ताकदवान ऑस्ट्रेलियाने पहिल्या हॉकी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 5-1 असा धुव्वा उडवला. भारताकडून किमान जोरदार प्रतिकाराची अपेक्षा केली जात होती; परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना संधी दिली नाही. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टॉम विकहॅम (20 आणि 38 मि.), टीम ब्रँड (3 मि.), ज्योएल रितांला (37) आणि फ्लिन ऑलिवी (57) यांनी गोल केले; तर भारताचा एकमेव गोल गुरजंत सिंगने 47 व्या मिनिटाला केला.

घरच्या मैदानावर खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून तिसर्‍याच मिनिटाला पहिला गोल केला आणि आपले खाते उघडले. टीम ब्रँडने हा गोल केला. त्याला मिळालेल्या दीर्घ पासवर प्रथम त्याने जरमनप्रीत सिंगला चकवले आणि लगेचच भारताचा गोलरक्षक श्रीजेशलाही चकवत चेंडू भारताच्या गोलजाळ्यात मारला. ऑस्ट्रेलियाने आपले आक्रमण कायम ठेवले आणि भारतीय बचावावर हल्ले केले आठ मिनिटानंतर त्यांना पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण यावेळी श्रीजेशचा बचाव अभेद्य ठरला आणि ऑस्ट्रेलियाला गोल करता आला नाही.

एका मिनिटभरात ऑस्ट्रेलियाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला यावेळीही श्रीजेशने आपली लवचिकता दाखवत ऑस्ट्रेलियाला गोलापासून दूर ठेवले. यादरम्यान भारताला 10 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण भारतालाही तो सत्कारणी लावता आला नाही. दुसर्‍या अर्धात पाच मिनिटांचा खेळ होत नाही, तो ऑस्ट्रेलियाच्या नावावर दुसरा गोल झळकला भारतीयांचा ढिसाळ बचाव यास कारणीभूत ठरला.

मध्यांतरानंतर ऑस्ट्रेलियाने आपले आक्रमण कायम ठेवत भारतीयांना श्‍वास घेण्याचीही संधी दिली नाही. या संधीचा फायदा घेत विकहॅमने 20 व्या आणि 38 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. चार गोल स्वीकारल्यानंतर भारतीयांनी चपळता आणली; परंतु गोल करण्याची संधी ते निर्माण करू शकत नव्हते. त्यातूनही तिसर्‍या अर्धात दोन संधी मिळाल्या; पण त्यावर ऑस्ट्रेलियन गोलरक्षरक अँड्र्यू चार्टर्ड याने गोल होऊ दिले नाहीत.

चौथ्या अर्धाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु या वेळीही श्रीजेशने उत्तम गोलरक्षण केले. अखेर काही वेळानंतर भारताने प्रतिआक्रमण केले आणि गुरजंतने गोल करून पिछाडी कमी केली; पण हा गोल भारतीयांसाठी एकमेव ठरला. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पर्थ येथेच होणार आहे. पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी ही मालिका भारतीयांसाठी महत्त्वाची आहे.

Exit mobile version