। बर्लिन । वृत्तसंस्था ।
जिगरबाज ऑस्ट्रियाने जबरदस्त कामगिरी साधताना नेदरलँड्सला 3-2 असे हरविले, त्याचबरोबर माजी विजेत्या फ्रान्सलाही मागे टाकून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात अव्वल स्थान मिळविले.
मार्सेल झाबित्सर याने सामन्याच्या 80 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रियाने 34 वर्षांत प्रथमच नेदरलँड्सवर मात करण्याची किमया साधली. यापूर्वी 30 मे 1990 रोजी डच संघाविरुद्ध ऑस्ट्रियन संघ अखेरच्या वेळेस जिंकला होता. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला फ्रेंच खेळाडू डॉनयेल मालेन याच्या स्वयंगोलमुळे ऑस्ट्रियाला आघाडी मिळाली होती. उत्तरार्धात नेदरलँड्सने जोरदार टक्कर दिली. कॉडी गाक्पोने 47 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे त्यांनी बरोबरी साधली. नंतर रोमानो श्मिद याच्या भेदक हेडरमुळे ऑस्ट्रियाला 59 व्या मिनिटास पुन्हा आघाडी घेणे शक्य झाले. 75 व्या मिनिटाला मेम्फिस डिपाय याच्या गोलला व्हीएआरद्वारे मंजुरी मिळाल्यानंतर नेदरलँड्सने 2-2 अशी बरोबरी साधली होती.
ऑस्ट्रियाने ‘ड’ गटात दोन विजय व एका पराभवासह सहा गुण नोंदवून पहिला क्रमांक मिळविला. फ्रान्सचे एक विजय व दोन बरोबरींसह पाच गुण, तर नेदरलँड्सचे प्रत्येकी एक विजय, बरोबरी आणि पराभवामुळे चार गुण झाले आहेत.