बजेट अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने; राज्यपालांचे भाषण सत्ताधार्‍यांनी पाडले बंद

विधिमंडळात जोरदार घोषणाबाजी
| मुंबई | दिलीप जाधव |

सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळाने अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. राज्यपालांनी नुकतेच औरंगाबाद येथील कार्यक्रमात रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असे विधान केले होते. त्यावरुन सत्ताधार्‍यांनी राज्यपालांना धारेवर धरले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नसल्याने विरोधकांनी विधिमंडळ सभागृहात आणि सभागृहाबाहेरही जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची याला किनार होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होते. त्यामुळे आज विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहाच्या आमदारांच्या उपस्थितीत राज्यपालांचे अभिभाषण सुरू होताच सत्ताधारी आमदारांनी ङ्गजय शिवाजी, जय भवानीफ तर भाजपच्या आमदारांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे भाषणात व्यत्यय येत होता. अखेर राज्यपालांना आपले अभिभाषण आटोपते घ्यावे लागले. आणि, राष्ट्रगीताची वाट न पाहता राज्यपाल विधान भवनातून निघून गेले. तेव्हा सभागृह अवाक् झाले. राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2021/22च्या 6250.36 कोटी रुपयांच्या पूरक मागण्या सभागृहात मांडल्या.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून, या अधिवेशनात जनतेच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे. हे अधिवेशन पूर्णवेळ चालेल; परंतु भाजप जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यात अडथळे आणत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही, असेही पटोले म्हणाले.

मलिकांच्या राजीनाम्याची मागणी
सक्तवसुली संचलनालयाने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली. सभागृहात मलिक यांच्या नावाने शिमगा करत सभागृह डोक्यावर घेतले.

लतादीदी, एनडींना श्रद्धांजली
विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, रामनिवास सिंह, एन.डी. पाटील, सुधीर जोशी, दत्तात्रय लंके, संजीवनी हरी रायकर, आशाताई टाले, कुमुद महादेव रांगणेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला. सभागृहातील सर्व सदस्यांनी दिवंगत सदस्यांना उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

तालिका सभापतींची निवड
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तालिका अध्यक्ष म्हणून आमदार भास्कर जाधव, संजय शिरसाट, कालिदास कोंळबकर, कुणाल पाटील आणि दीपक चव्हाण अशा पाच ज्येष्ठ आमदारांची घोषणा केली. तर, विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तालिका सभापती म्हणून आमदार मनीषा कायंदे, विक्रम काळे, अमर राजूरकर, रामदास आंबटकर या ज्येष्ठ आमदारांची तालिका सभापती म्हणून घोषणा केली.

Exit mobile version