चालक गंभीर जखमी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|
अलिबाग-वावे मार्गावरील घोटवडे येथे सोमवारी (दि.20) सकाळच्या सुमारास रिक्षा पलटी झाल्याची घटना घडली. त्यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खासगी वाहनाने दवाखान्यात दाखल करण्यात आले. कुत्रा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी तळा तालुक्यातील तिघेजण रिक्षामधून अलिबागकडे निघाले होते. सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास ते रोह्यावरून अलिबागकडे निघाले असता, या मार्गावर अचानक त्यांच्या रिक्षासमोर कुत्रा आडवा आला.त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा पूर्ण पलटी झाली. त्यात चालकाला गंभीर दुखापत झाली असून, रिक्षातील अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, अलिबाग- रोहा मार्गावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे ही मोठी समस्या बनली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लहानांपासून मोठ्यांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्याच्या बाजूला अथवा एका मोकळ्या जागी चिकन व अन्य मांसाहार पदार्थ टाकले जात आहेत. त्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालविताना भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या कुत्र्यांविरोधात योग्य ते पाऊल स्थानिक प्रशासनाने उचलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
