काशीद समुद्रकिनाऱ्यासाठी स्वयंचलित स्वच्छता यंत्र

स्वच्छतेस मिळणार गती

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारा स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पुढाकारातून काशीद ग्रामपंचायतीला स्वयंचलित समुद्रकिनारा स्वच्छता यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्रासाठी सुमारे 75 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, किनाऱ्यावरील वाढता कचरा लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात आली आहे.

काशीद समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी सुमारे सात लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. त्यामुळे प्लास्टिक कचरा, अन्नाचे अवशेष तसेच इतर घाण मोठ्या प्रमाणात साचत होती. सुमारे दोन किलोमीटरहून अधिक लांबीच्या या किनाऱ्याची स्वच्छता राखण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज भासत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले यांच्या प्रयत्नांतून हे यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे लोकार्पण मुरुड पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सरपंच संतोष राणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यंत्र उपलब्ध झाल्याने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता अधिक जलद आणि सुलभ होणार असून, काशीदचे पर्यटनस्थळ म्हणून असलेले आकर्षण आणखी वाढेल, असा विश्वास सरपंच संतोष राणे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version