। अलिबाग । प्रमोद जाधव ।
समुद्रकिनार्यांवर होत असलेल्या कचर्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला जात आहे. प्लास्टिक बाटल्या, मलमूत्रासह कचर्यामुळे किनार्यावरील प्रदूषण वाढण्याची भीती अधिक असते. किनार्यावरील हे प्रदूषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने किनार्यावरील स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित यंत्र रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात दाखल झाले आहे. अलिबागसह अनेक समुद्रकिनार्यांवरील स्वच्छता राखण्याचे काम स्वयंचलित यंत्र करीत असल्याने स्वच्छतेसाठी हे यंत्र वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, मांडवा, काशीद, आवास, किहीम, मुरुड, रेवदंडा, दिवेआगर, नागाव, आक्षी, श्रीवर्धन, वरसोली अशा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजागार उपलब्ध होत आहे, परंतु किनारी असलेल्या कचर्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती अधिक असते. याठिकाणी स्थानिक पर्यटकांसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील, राज्यातील, देश-विदेशातील पर्यटक आकर्षित होत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिवार-रविवारी असलेल्या सुट्टीसह अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची या समुद्रकिनार्यांवर प्रचंड गर्दी होत आहे.
जिल्ह्यात वर्षाला दहा लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. यातून कोट्यवधींची उलाढाल होते. किनार्यांवरील टपर्यांपासून हॉटेल, कॉटेजेस, फार्म हाऊस, तसेच वेगवेगळ्या प्रवासी वाहनांना पर्यटनातून आर्थिक बळ मिळत आहे. परंतु, समुद्रकिनार्यांवर पडलेला कचरा, प्लास्टिक बाटल्या अशा अनेक करणांमुळे किनार्यांवरील प्रदूषण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रदूषणामुळे किनार्यांवरील सौंदर्य नष्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. किनारी ठिकठिकाणी पडलेला कचरा, पाणी पिण्याच्या रिकाम्या प्लास्टीक बाटल्या बरोबरच किनारी असलेले उंट, घोड्यांचे मलमुत्र यामुळे किनारे अस्वच्छ दिसून येत आहेत. त्याचा परिणाम किनार्यावरील सुंदरतेवर होत आहे. कचरा असल्याने पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यास जात नाही. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील पर्यटनवाढीला अधिक चालना देणे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, तसेच किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. किनार्यांवरील स्वच्छता राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रायगड जिल्ह्यासाठी स्वयंचलित यंत्र देण्यात आले आहे. हे स्वयंचलित यंत्र शुक्रवार, 22 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात दाखल झाले. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवार 25 जूलै रोजी अलिबागमध्ये झाला. या यंत्राद्वारे किनार्यांवरील स्वच्छता राखली जात आहे. जलद गतीने अगदी कमी वेळेत किनारे स्वच्छ करून किनार्यावरील पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे किनार्यावरील स्वच्छतेसाठी हे यंत्र एक वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.