पनवेलमध्ये शवविच्छेदनाची समस्या गंभीर

राज्यातील सर्वात जास्त शवविच्छेदन

| पनवेल | प्रतिनिधी |

मुंबई मधील जे.जे. रुग्णालयात केल्या जात असलेल्या शवविच्छेदना पेक्षा जास्त संख्येने पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे. यामुळे राज्य शासनाकडून पनवेलमध्ये स्वतंत्र शवविच्छेदन केंद्र उभारण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पनवेलसाठी 2019 पासून कार्यान्वित झालेल्या उपजिल्हा रूग्णालयात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात पनवेलकरांना वरदान ठरलेल्या या रूग्णालयात सध्या अनेक अडचणी आहेत. रूग्णालय 100 खाटांचे असुन या दोन मजली इमारतीला शासनाच्या नियमानुसार मुबलक सफाई कर्मचारी देखील नाहीत. परिणामी येथे कायम अस्वच्छता पसरलेली असते. त्यामुळे 200 खाटांच्या रूग्णालयाला मंजुरी मिळालेली आहे. भविष्यात येथे नवीन रूग्णालय उभे राहील; परंतु येथील शवविच्छेदन केंद्राची समस्या सुटू शकणार नाही.

सद्यस्थितीत असलेले केंद्रात बेवारस शव ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेची सुविधा नसल्यामुळे अधूनमधून दुर्गंधीची समस्या सुरू असते. यातच पनवेल तालुक्याची लोकसंख्या मोठी आहे. परिसरात होणारे अपघात पाहता सध्यस्थितीत कमी क्षमता असतानाही वर्षांला तब्बल 1 हजार पेक्षा जास्त शवविच्छेदन केले जातात. राज्य शासनाच्या मुंबईतील जे.जे. रूग्णालयात यापेक्षा कमी म्हणजेच 900 ते 1 हजार शवविच्छेदन केले जात आहेत. मुंबईतील इतर 4 शवविच्छेदन केंद्र मुंबई महापालिकेची आहेत तर, 5 गृहविभागाची आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या शवविच्छेदनाची आकडेवारी पाहिल्यास सध्या पनवेलचे उपजिल्हा रूग्णालय सर्वाधिक मोठे केंद्र ठरले आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आंबादास देवमाने यांच्या सुचनेनुसार राज्य सरकारकडे पनवेलसाठी स्वतंत्र शवविच्छेदनाची गरज असल्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

स्वतंत्र व्यवस्थापन
पनवेलमध्ये स्वतंत्र शवविच्छेदन केंद्र झाल्यास गृहविभागाच्या मान्यतेने नगरविकास विभागाकडून मंजुरी देण्यात येणाऱ्या केंद्र 20 गुंठे क्षेत्रात बांधले जाते. स्वतंत्र 25 कर्मचारी मिळतात. एकावेळी 100 मृतदेह राहू शकतील अशी वातानुकूलित यंत्रणा उभी रहात असल्यामुळे पनवेलचा मोठा प्रश्न सुटणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून जागा मिळावी अशी अपेक्षा आरोग्य विभागाला आहे.

पनवेल तालुक्याची लोकसंख्या परिसरात असलेल्या महामार्गामुळे मृतांची संख्या जास्त असते. मुंबईतील मोठ्या समजल्या जाणाऱ्या जे.जे. रूग्णालयापेक्षा जास्त शवविच्छेदन पनवेलमध्ये होत आहेत. सद्यस्थितीत तेवढी क्षमता नसताना देखील अत्यंत अडचणीत शवविच्छेदन केले जात आहे. त्यामुळे नव्या शवविच्छेदन केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

डॉ. बालाजी फाळके, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक
Exit mobile version