। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडको महामंडळाकडून नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्थांस महिला मंडळाकरिता नवी मुंबईतील चार भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेतील एकूण चार भूखंडांपैकी दोन भूखंड हे नेरूळ नोडमध्ये तर उर्वरित दोन भूखंड हे अनुक्रमे उलवे आणि एक भूखंड द्रोणागिरी नोडमध्ये उपलब्ध आहे.नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या सर्वांगीण विकासास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. या योजने अंतर्गत महिला मंडळांकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिला मंडळांकडून चालविण्यात येणार्या विविध उपक्रमांद्वारे प्रकल्पबाधित महिलांच्या सक्षमीकरणास हातभार लागणार आहे.
सदर योजने अंतर्गत सेक्टर-23 (दारावे), नेरूळ, सेक्टर-6 (सारसोळे), नेरूळ, सेक्टर-2, उलवे सेक्टर-52, द्रोणागिरी नोडमध्ये एक याप्रमाणे एकूण चार भूखंड हे नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या नोंदणीकृत संस्थांना महिला मंडळांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे 72.38 चौ.मी. ते 199.61 चौ.मी. क्षेत्रफळाचे आहेत. 20 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत,कार्यालयीन वेळेत व्यवस्थापक (पुनर्वसन) कार्यालय, सिडको लि., सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक वाणिज्यिक संकुल, टॉवर क्र. 7, 7 वा मजला, नवी मुंबई – 400614 या ठिकाणी विक्रीकरिता उपलब्ध आहेत.