तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील काल रविवार दि.१८ डिसेंबर रोजी १७ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील १७ ग्रामपंचायती मधिल एकूण ६१ मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळ पासूनच उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात केली होती. एकूणच दिवसभरात सर्वच ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. उरण तालुक्यात सरासरी ८८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, नवीनशेवा, बोकडविरा, भेंडखळ, नवघर, पागोटे, जसखार, करळ, धुतुम, चिर्ले, रानसई, कळंबुसरे, पिरकोन, सारडे, वशेणी व पुनाडे या १७ ग्रामपंचायतीमध्ये काल मतदान अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पाडण्यात आले. शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या आधिपत्याखाली प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह राखीव पोलिस पोलिस दलाच्या तुकड्या सज्ज ठेवल्याने किरकोळ बाबी वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी दिली आहे.