। सुधागड -पाली । वार्ताहर ।
खोळंबलेले नूतनीकरण, स्थानकातील खड्डे, चिखल, घाण आणि दुर्गंधी अशा अनेक कारणांमुळे पालीतील बस स्थानक नेहमीच चर्चेत असते. गुरुवारी (दि.28) तर सकाळी साडेअकरा वाजून गेले तरी स्थानकाच्या कार्यालयाला टाळे होते. येथे वाहतूक नियंत्रक किंवा इतर कर्मचारी कोणीही हजर नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
स्थानकात सकाळपासूनच विद्यार्थी व प्रवाशांनी गर्दी केली होती. गाड्यांचे वेळापत्रक, माहिती पुरविणे, पास देणे आदीसाठी स्थानकात कोणीच कर्मचारी नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची अडचण झाली होती. स्थानक वार्यावरच सोडून दिल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली होती. या संबंधी माहिती घेण्यासाठी परिवहन महामंडळ रायगडच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
बसचे वेळापत्रक विचारण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता पाली स्थानकात गेलो होतो. मात्र स्थानकाचे कार्यालय बंद होते. कार्यालयाला कुलूप लावले होते. तरीही अर्धा तास वाहतूक नियंत्रक किंवा परिवहन कर्मचारी येण्याची वाट पाहिली; मात्र कोणीही आले नाही.
– दत्तात्रेय दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुधागड