जि.प. निवडणुकांअभावी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लांबणीवर
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी पाच सप्टेंबरला देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद निवडणुकांअभावी लांबणीवर गेला आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांना प्रत्यक्षात पुरस्कार वितरीत न केल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जाते. काही शिक्षक शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास वाढविण्याबरोबरच शारिरीक विकास वाढविण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी टीकवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्तृत्वान शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्काराच्या प्रतिक्षेत असल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यावर नव्याने निवडणूक अद्याप घेतली नाही. त्यामुळे या जिल्हा परिषदेवर प्रशासकिय कामकाज सुरु आहे. गेल्या दोन वर्षापासून निवडणूका झाल्या नाहीत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षापासून 60 आदर्श शिक्षकांचे पुरस्कार देणे लांबणीवर गेले आहे. जो पर्यंत निवडणूक होत नाही. जिल्हा परिषद अध्यक्षांपासून सदस्य बसत नाही. तो पर्यंत पुरस्कार वितरीत करणे थांबले आहे. जिल्हा परिषद निवडणुक अभावी शिक्षकांचे पुरस्कार लांबणीवर गेले आहे. पुरस्कार जाहीर होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. मात्र प्रत्यक्षात पुरस्कार न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. पुरस्कार कधी देणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.