| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत अंतर्गत रस्ते येत आहेत. यातील दास्तानफाटा ते चिरले ,जासई ते गव्हाण मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्याने दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे मार्ग वाहतुकीला धोकादायक बनले आहेत. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने आयात – निर्यातीसाठी तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीत खाजगी गोदामे,एम.टी. गोदाम उभारण्यात आले आहेत. त्यातील बहुतांशी गोदामे ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याला लागून वसविण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून बनविण्यात आलेले रस्ते अवजड वाहतुकीच्या अनुषंगाने रस्त्याचा दर्जा योग्य नसल्याने गोदामात येणार्या मालाचे अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळेच रस्त्याला खड्डे पडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत चिर्ले येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र अतिवृष्टी आणि अवजड वाहतुकीमुळे रस्ताच शिल्लक राहिला नाही.आजही हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.