सुविधेपेक्षा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन महत्वाचे; शौचालयअभावी महिलांची कुचंबना
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथे सार्वजनिक बांधकाम मंडळामार्फत महिलांसाठी अत्याधुनिक वातानुकूलित शौचालय आणि सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या सुविधा केंद्राचे काम पूर्ण होऊन 4 महिने लोटले असून फक्त उद्घाटनाची औपचारिकता बाकी आहे. या केंद्राचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 29 मे रोजी करण्यात येणार होते. त्यावेळी मंत्री येणार म्हणून पालिकेकडून परिसरात साफसफाई करण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव त्यांचा शासकीय दौरा रद्द झाला. या गोष्टीला दीड महिना उलटा तरी हे शौचालय अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शौचालय अभावी येथील महिलांची कुचंबना होत आहे.
कर्जत स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या भिसेगाव या ठिकाणी रिक्षा स्टँड तसेच बस, विद्यार्थ्यांचे आणि कंपनी बस थांबे असल्याने रिक्षा स्टँड आहेत. त्यामुळे या नाक्यावर कायम नागरिकांची वर्दळ असते. त्यातच परिसरात महिला व पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारची शौचालयाची सुविधा नाही. मात्र, गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झाली असली तरी महिलांसाठी का होईना सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक आणि वातानुकूलित ‘वोलौ’ नामांकित असे सुविधा केंद्र उभारले आहे. परंतु, उद्घाटन न झाल्यामुळे ते खुले करण्यात आलेले नाही. एकंदरीत सार्वजनिक विभागाला महिलांच्या सुविधेपेक्षा मंत्र्यांचे हस्ते उद्घाटन होणे महत्वाचे वाट असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महिला वर्गाला शौचालय सुविधा अभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याची बांधकाम विभागाने थोडी तसदी घ्यावी, असे वाटत नाही का? केवळ उद्घाटनाचा फार्स समोर ठेवून महिलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांसाठी तयार केलेल्या सुविधा केंद्राला मागील दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला असून अद्याप हे सुविधा केंद्र महिलांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले गेले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्याबाबत महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. तसचे, सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्री महोदयांची वाट पाहण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाकडून शौचालयाचे उद्घाटन करून ते महिलांसाठी खुले करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
चार महिन्यांपूर्वी या शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. उद्घाटन न झाल्याने शौचालय असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे महिलांना सुवेधेपासून वंचित रहावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने या शौचालयाचे लवकरात लवकर उद्घाटन करून ते महिलांसाठी खुले करावे.
– मनिषा ठोंबरे, भिसेगाव
स्थानिक लोकप्रतिंधींसोबत चर्चा करून या शौचालयाचे उद्घाटन आठवड्याभरातच करण्यात येईल.
– संजय वानखेडे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत






