अवकाळीच्या पंचनाम्यांची प्रतीक्षा

। नेरळ । प्रतिनिधी ।

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांवर शासनाची अवकृपा एकही शेतकर्‍याच्या शेतीचा तसेच मोडलेल्या घरांचा पंचनामा न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुक्यातील सर्वाधिक भात पीक नुकसान चांदई गावातील झाले असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे तरी देखील या गावात पंचनामे करण्यासाठी शासनाची यंत्रणा पोहचली नाही.

मागील आठवड्यात कर्जत तालुक्यासह महाराष्ट्रात अवकाळीने धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले. चांधई येथील भगवान कोळंबे यांचा गुरांचा वाडा तसेच नसरापूर येथील शेतकर्‍यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच राज नाल्याच्या पाण्यावर खरीप हंगामात शेतीची लागवड केलेल्या चांधई, मार्केवाडी, तांबस, वडवली अशा अनेक गावातील शेतकर्‍यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच त्या नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती परंतु आठवडा उलटून सुध्दा एकाही अधिकारी वर्गाने या नुकसानीची पाहणी केली नसल्याने शेतकरी वर्गात अत्यंत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांधई येथील अनेक शेतकरी यांचे खरीप हंगामातील लागवडीचे अवकाळीने अत्यंत नुकसान झाले.या अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह येऊन शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याचे काम केले असून शासन आणि सरकार यांनी सदर नुकसानीची पाहणी करणे क्रमप्राप्त होते.परंतु आज आठवडा उलटून गेल्यानंतरही एकाही अधिकारी वर्गाने साधी पाहणी केलेली नाही.काही शेतकर्‍यांच्या कापलेल्या भाताला पुन्हा मोड आले होते त्या शेतकर्‍यांना ना भात मिळाला ना पेंढा. या लागवडी करता शेतकर्‍यांना मजूर मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांची मजुरीमध्ये मिळणार्‍या भाताची पन्नास टक्के रक्कम जाते.त्यामुळे काही शेतकरी खरिपात पेंढा विकून आपले नुकसान भरून काढत असतात. अवकाळी पावसामुळे भात आणि पेंढा असे दोन्ही गोष्टींचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.यातच शासनाकडून अधिकारी वर्गाने पंचनामा तत्काळ करणे गरजेचे असताना कुठल्याही अधिकार्‍याने याकडे फिरकुनदेखील न पाहिल्याने शेतकरी वर्गामध्ये असंतोष आहे.

Exit mobile version