उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत

| उरण | वार्ताहर |

नेरूळ ते उरण या बहुप्रतीक्षित मार्गावर पाच-सहा महिन्यांपूर्वी चाचणीदरम्यान नेरूळ स्थानकातून निघालेली रेल्वे थेट उरण स्थानकात जाऊन थांबली. पहिल्यांदाच उरण शहरात रेल्वे पोहोचली. तेव्हापासून या मार्गावरील प्रवाशांचे लक्ष या रेल्वेसेवेकडे लागले आहे. आता खारकोपरपर्यंत थांबणारी रेल्वे प्रवाशांना घेऊन उरणला थांबणार, अशी भावना निर्माण झाली होती. मात्र, या मार्गावर रेल्वे चालवण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर पाच-सहा महिने उलटूनही प्रत्यक्षात उरणपर्यंत रेल्वे सेवा सुरू झालेली नाही.

आता या मार्गावरील अडचणी, त्रुटी दूर करण्याच्या सूचना रेल्वे आयुक्तांकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार यावर कामे सुरू आहेत. ही कामे दिवाळीपूर्वी होणे शक्य नसल्याने उरणपर्यंत रेल्वेने प्रवास करण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता पुन्हा एकदा रेल्वे चालवून चाचपणी सुरू आहे. परंतु रेल्वे कधी सुरू होणार याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावर्षीच्या मार्च महिन्यात उरणपर्यंतच्या संपूर्ण रेल्वे मार्गाची उभारणी पूर्ण झाल्यावर खारकोपर ते उरण या मार्गावर रेल्वे चालवून या मार्गाची पडताळणी करण्यात आली. उरण स्थानकात रेल्वे पोहोचल्यावर आता रेल्वे सेवा सुरू होणार, अशी आशा सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. रेल्वेही हा मार्ग सुरू करण्यासाठी उत्सुक होती, मात्र रेल्वे आयुक्तांनी या कामात काही त्रुटी सांगितल्या. त्या दूर करण्यासाठी सांगितलेली कामे आता पूर्ण होत असतानाच मागच्या महिन्यात झालेल्या पावसात उरण स्थानक पाण्यात बुडाले. स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचून तळे निर्माण झाले होते. त्यात अनेकांनी पोहण्याचा आंनदही लुटला. यामुळे रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या कामात त्रुटी राहिल्याचे जाणवले. स्थानकात पाणी साचू नये याची काळजी ही रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
उरण रेल्वे लवकरच सुरू होणार अशा वावड्या उठविल्या जात होत्या. परंतु रेल्वे काही सुरू झाली नाही. आता पुन्हा एकदा काही दिवसांपासून रेल्वे उरण पर्यंत आणून चाचपणी सुरू असल्याचे रेल्वे सूत्राकडून सांगितले आहे. गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या उरण रेल्वेला कधी मुहूर्त मिळतो याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version