| रेवदंडा | वार्ताहर |
को.ए.सो. विद्या संकुलाचे माजी मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक दिपक गजानन मोकल यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल रियल लाईफ सुपर हिरो म्हणून राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्काराने नुकतेच दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
दिल्ली तीन मूर्ती भवन येथे (दि.28) एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री व भारत नृत्य डान्सर सुधाचंद्रन यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याबद्दल रियल लाईफ सुपर हिरो म्हणून दिपक मोकल यांना मेडल, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. मोकल उपस्थित होत्या.
रेवदंडा येथील रहिवासी असलेले दिपक मोकल यांचे मुळ गाव पेण तालुक्यातील बेनवले आहे. अलिबाग को.ए.सो. संकुलात नोकरी करत असताना तीस वर्षे त्यांनी क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून योगदान दिले. सध्या ते डायरेक्ट हॉलिबॉल असोसिएशनच महाराष्ट्रचे जनरल सेके्रटरी व डायरेक्ट हॉलिबॉल फेडरेशन इंडियाचे जनरल सेके्रटरी म्हणून क्रियाशील आहेत. दिपक मोकल क्रीडा शिक्षक तसेच राष्ट्रीय कबड्डी पंच कार्यरत असताना ग्रामीण भागातील क्रीडा संस्थांमध्ये कबड्डी, खो-खो, हँडबॉल, अॅथलेस्टिक, कॅरम या खेळांचा प्रचार व प्रसार केला असून, आजपर्यंत 22 राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. रायगड जिल्हाचे कबड्डी पंच म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार, पाटणा, पतियाळा, पंजाब या ठिकाणी उत्तम काम केले आहे.
दिपक मोकल यांना क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल रायगड भूषण, राज्य क्रीडारत्न, राष्ट्रीय क्रीडा रत्न, आदर्श जिल्हा क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासन जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार, ठाणे-मुंबई आगरी पुरस्कार, कुलाबा जीवन गौरव पुरस्कार, प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड, आदिवासी समाज संघटना क्रीडा पुरस्कार रायगड जिल्हा आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.