आदिवासी विकास सेवा संघास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील उसरोली गावातील आदिवासी विकास सेवा संघ संलग्न नेहरू युवा केंद्र, अलिबाग-रायगड या संस्थेला राज्य शासनाचा प्रतिष्ठीत असा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदरील पुरस्काराचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. पुरस्काराचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हुडा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी विकास सेवा संघाचे संचालक भारत बागवे व त्यांच्या पत्नी ज्योती बागवे यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व संस्थेला 25 हजार रुपये प्रदान करण्यात आले आहेत.

मुरुड तालुक्यातील उसरोली गावात आदिवासी विकासक सेवा संघाचे कार्य सुरू आहे.सदरील संस्था आदिवासी मुलांसाठी पाळणा घर, बालवाड्या व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. तसेच महिला बचत गट स्थापन करून त्यांना कर्जपुरवठा करण्याचे व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा या संस्थेमार्फत केले जाते. आदिवासी लोकांना आधार कार्ड काढून देणे, रेशनकार्ड, मतदान कार्ड तसेच रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड काढून देणे आदी महत्त्वाचे कार्य या संस्थेने केले आहे. याची दखल घेत राज्य शासनाकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव स्वीकारत राज्य शासनाकडून भारत बागवे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version