जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान

शालेयस्तरावर प्रत्येक मुलांची तपासणी, 257 वैद्यकीय अधिकारी तैनात
| महाड । वार्ताहर ।
वेळेत रोग निदान व उपचार झाले तर पुढची पिढी सुदृढ राहील, या विचाराने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत दिलेल्या सूचनेनुसार जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान जिल्ह्यात राबवले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 18 वर्षापर्यंतच्या चार लाख 59 हजार 957 बालकांची तसेच किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बाल विकास, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाच्या राज्यभरात जागरूक पालक, सुदृढ बालक हे अभियान राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापर्यंतच्या बालकाची/ किशोरवयीन मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजारी बालकांवर त्वरीत उपचार, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे यांचा समावेश आहे. तपासणीसाठी 257 पथकामधील वैद्यकीय समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत 9 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या दोन महिन्यामध्ये चार लाख 59 हजार 957 मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.

आजाराचे त्वरीत निदान, औषधोपचार
अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे बालकामधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सी अन्य आजाराची संदिग्ध रुग्णांवर त्वरीत औषधोपचार करणार आहेत. तसेच 0 ते 6 वयोगटातील मुलांमध्ये ब्लब फुट, दुभंगलेली टाकू यावर उपचार होणार आहेत. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, एक्स रे, ई.सी.जी. केले जाणार असल्याने मुलांमधील आजारांचा धोका कमी होणार आहे.

महाड तालुक्यातही गुरुवारपासून जागरूक पालक, सुदृढ बालकफ अभियानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मुलांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार पथके तैनात करण्यात आली आहेत. – डॉ. नितीन बावडेकर, आरोग्य अधिकारी, महाड

Exit mobile version