। अलिबाग । प्रतिनिधी ।
थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांनी किर्तनातून समाज प्रबोधन, अंधश्रध्दा निर्मूलन आणि स्वच्छता संदेशाचा प्रसार केला. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान तसेच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एकभाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांकरीता स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, याकरीता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था डॉ. मिलींद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी समाज सुधारण्याचे चळवळीमध्ये थोर समाजसेवक संतगाडगेबाबा यांचे विसाव्या शतकात मोलाचे योगदान होते, यांची जाणीव बंद्यांना करुन दिली. तसेच संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचे ध्येय हाती घेऊन त्यांनी गावागावात जाऊन समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. थोर समाजसेवक संत गाडगेबाबा यांनी समाजात असलेल्या वाईट चालीरिती, परंपरा, अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता दुरकरण्याकरीता किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करुन समाज सुधारण्याचे कार्य केले. तसेच, स्वत:च्या मनाची, शरीराची व आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करण्याबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग-रायगड तसेच, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, कारागृह शिपाई रविंद्र वाघमारे, प्रशांत पाटल इत्यादी उपस्थित होते.
संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त कारागृहात जनजागृती
