गावोगावी फिरून एसीबीने दिला लाचखोरी रोखण्याचा मंत्र
| तळा | प्रतिनिधी |
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तळा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत प्रभावी जनजागृती केली.
रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गावागावात भेटी देऊन नागरिकांना भ्रष्टाचार कसा केला जातो, त्याची तक्रार कोठे आणि कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले की, जो कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी तुमचे काम करून देण्यासाठी पैशाची मागणी करीत असेल त्याची तक्रार आमच्याकडे द्या. तुमचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, यासाठीच हे दक्षता जनजागृती अभियान राबवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या जनजागृती मोहिमेत पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, पोलीस हवालदार परम ठाकूर, पोलीस हवालदार सुमित पाटील, पोलीस शिपाई वापोजी कोलमकर आणि महिला पोलीस शिपाई मोनिका मोरे उपस्थित होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
