नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पनवेल महानगर पालिका येथे वासुदेवर बळवंत फडके नाट्यगृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानातून भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश पोहोचविण्यात आला. यावेळी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, सशक्त आणि एकसंध भारत घडवू, कामामध्ये पारदर्शकता वाढविण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, नवी मुंबईचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके, पनवेल महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, पोलीस अंमलदार, महानगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी इतर विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दक्षता आपली सामायिक जबाबदारी ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी असून, त्यांनी दक्ष राहावे, भ्रष्टाचाराला आळा बसविण्याची माहिती मान्यवरांनी देत दक्षता जनजागृती सप्ताहाचे महत्त्व स्पष्ट केले. सर्वांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत भ्रष्टाचाराचे आणि लाच घेण्याचे दुष्पपरिणाम समजावून सांगण्यात आले.
एसीबीकडून आवाहन
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना नागरिकांनी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात भ्रष्टाचारसंबंधित तक्रारी असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई येथे टोल क्रमांक 1064, व्हॉट्सॲप क्रमांक 7066635666 येथे संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले.






